सिंहगडाची सायकलस्वारी
कलंदर प्रफुल्ल डांगे यांना फाट्यावर मारून सिंहगड सायकल सफर केल्याबद्दल माफी मागून लेखारंभ करतो.
डांगे,आपली सिंहगड सफर लवकरच होईल...थोडा धीर धरा.
तर सुरूवात अशी झाली....
प्रफुल्ल डांगे गेल्या कितीक दिवसांपासून हट्ट धरून बसले होते. सिंहगडावर सायकलीने जायचं म्हणून. योग येतच नव्हता. गेले साताठ रविवार काही ना काही निमित्ताने कामातच गेले. सिंहगडाला थोडं होल्डवर ठेवले. या आठवड्यात मंगळवारी की बुधवारी कधीतरी सरकाराची मर्जी पाहून माझ्या सिंहगड सायकल सफारीचा प्रस्ताव मांडला. सरकारपक्षाला प्रस्ताव मान्य झाला. गुरुवारी बरेच दिवस पावसामुळे यार्डात पडलेली सायकल बाहेर काढली. भंडारा डोंगरावर जाऊन आलो. शनिवारी सकाळी डांगेंना फोन केला. सिंहगड सायकल सफरी बद्दल सांगितले. पण त्यांचा सज्जनगडावर जाण्याचा प्लॅन आधीपासूनच ठरलेला होता. एकतर गुरुवारी भंडारा डोंगरावर त्यांना न सांगता गेल्यामुळे त्यांनी आधीच कुरकुर केली होती. त्यात परत सिंहगडचा प्लॅन ते नसतानाच ठरवल्यामुळे त्यांनी लगेच निषेध नोंदवला. संध्याकाळी सायकलची बारीक-सारीक मरम्मत केली. संध्याकाळची ओपीडी झाली. रात्री घरी येऊन झोपायला बारा वाजले. सध्या घरात गणपतीच्या वाहनाने आसरा शोधला आहे. स्वयंपाक घरातील एक बरणी कुरतडून त्यांनी त्यांचा इरादा स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे गेले आठ दिवस स्वयंपाक घरात सरकारपक्षावर भीतीचे सावट आहे. आज पहाटे साडेचार वाजता स्वयंपाक घरातील कुठल्याशा आवाजाने सरकारांना जाग आली. त्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर एक गलेलठ्ठ उंदीर दृष्टीस पडला. स्वभावतःच त्यांच्या तोंडून उठलेल्या किंकाळीमुळे तो उंदीर घाबरून किचन ट्रॉलीच्या मागे पळाला. मग मला उठवण्यात आले.आठ दिवसांपासून घरात आणून ठेवलेला उंदीर पकडायचा पिंजरा एकदाचा बाहेर आला. भल्या पहाटे भजी तळणे शक्य नसल्यामुळे पापड तळून त्या पिंजऱ्यात ठेवण्यात आला. हे सगळं चालू असतानाच मला अपेक्षित असलेली मागणी सरकाराकडून झाली. "आता तू सिंहगडला जाऊ नकोस..." त्यावर " अगं, तानाजीराव काय म्हणतील मला... मी घरचं लग्न सोडून सिंहगड सर करायला गेलो आणि तू तद्दन एका छोट्याशा उंदरासाठी सिंहगडावर जायचं रद्द केलंस?? काय म्हणावं तुला?" असा डायलॉग मारला आणि पटकन झोपी गेलो. साहजिकच सकाळी उशिरा जाग आली. पटपट आवरून निघालो. सव्वा सात वाजून गेले होते. श्रीधरनगर मधून लिंक रोडला लागलो , नेमकी त्याचवेळी जगद्गुरु संत तुकोबारायांची पालखी लिंक रोड वरून चालली होती. आषाढी वारी करून पालखी परत देऊन निघाली आहे. सायकल वरूनच उभ्या उभ्या दर्शन घेतलं. पुढे दर्शन हॉल कडून उजवीकडे वळलो. एल प्रो चौकात डावीकडे वळून चापेकर चौकात आलो. चिंचवड गावातून मोरया गोसावी मंदिराकडे आलो. देवाला दुरूनच राम राम केला. पुढे निघालो. धनेश्वर पुलावरून पवना ओलांडली. डांगे चौक पार करून भूमकर चौकात आलो. डावीकडे वळून बायपास रोडला लागलो. पाऊस नसला तरी वातावरणात गारवा होता. सायकल मंद गतीनेच चालली होती. सूस-पाषाणचा चढ मारल्यानंतर मात्र स्नायूंना उत्तेजना मिळाली. सायकलने थोडी गती पकडली. चांदणी चौक पार केला. वारज्यासाठी बायपासवरून एक्झिट घेतला. माई मंगेशकर रुग्णालयाजवळ एका स्नॅक्स सेंटरवर पहिला विसावा घेतला. पोहे आणि चहा. पंधरा मिनिटातच पुढे निघालो, माई मंगेशकर रुग्णालयासमोरून वारजे माळवाडीकडे. गणपती माथा पार केला. वाटेत पीएमपीएमएलचा वारजे माळवाडीचा बस स्टॉप आहे. तिथल्या एका इमारतीवर एक पुतळा आहे, एका हात लांब करून अंगुलीनिर्देश करणाऱ्या माणसाचा... खडकवासला मतदारसंघाचे माजी आमदार श्री रमेश वांजळे यांचा आहे तो पुतळा. प्रत्येकवेळी हा पुतळा माझं लक्ष वेधून घेतो. पुढे शिवणेगाव ओलांडलं. एन डी ए गेट आलं. डावीकडे खडकवासला धरणाकडे वळलो. थोड्याच वेळात खडकवासला धरणाचा मनोहर नजारा दिसू लागला. मोजकाच वेळ थांबून पुन्हा पुढे निघालो. गोऱ्हे बुद्रुक गावात आलो. पुणे शहर संपून गाव सुरू झाल्याच्या खुणा दिसू लागल्या. रस्ते छोटे, जुन्यापुराण्या एमएटीची मागची सीट काढून टाकून, त्याला दुधाचे कॅन लटकवून चाललेले दुधवाले... कोल्हापूरच्या चंदगडपासून पुण्याच्या पार जुन्नरपर्यंत दुधवाल्यांचं हेच रुपडं दिसतं. पायात बाटाचे पावसाळी बूट, गुडघ्याच्या थोडं खालपर्यंत फोल्ड केलेली पॅन्ट.. शक्यतो चॉकलेटी रंगाची, नक्की मूळ रंग कोणता होता ते कळू न शकणारा शर्ट अंगात घातलेला, डोक्यावर होकायंत्रछाप गांधी टोपी, दिसायला किरकोळ वाटली तरी कष्टाने कणखर बनलेली शरीरयष्टी, डोळे आणि चेहऱ्यावरून जाणवणारा वृत्तीतला निडर आणि बिनधास्तपणा, असे दूधवाले त्यांच्या टारटार करत जाणाऱ्या एमएटीवरून जाताना पश्चिम महाराष्ट्रातल्या गावागावांत दिसतील. रस्त्यांवर पडलेले शेणाचे गोळे, मोकळी हिरवीगार माळरानं, मोकळी चरणारी गुरं, गावातल्या तरुणांचं त्या माळरानावरच्याच इडन गार्डन्सवर सुरू असलेलं क्रिकेट, शेतकऱ्यांची शेतांवर कामाला जायची लगबग, शेतांमध्ये शेतकरी बायकांची ओणवं उभं राहून चाललेली लावणीची कामं, पोराटोरांची त्या कामात चाललेली लुडबुड असं अस्सल गावपण दिसायला लागलं. या गोऱ्हे बुद्रुक गावात वाटेतच एक शाळा लागते. जिल्हा परिषदेची आहे. 1912 साली स्थापलेली. बाजूलाच बापूजी बुवा महाराजांचं मंदिर आहे. फार छान आहे शाळेचा परिसर. रविवार असल्यामुळे मुलांचा किलबिलाट नव्हता. पाच मिनिटांतच डोणजे गावात पोहोचलो. दुसरा विसावा याच गावात. चहा घेऊन निघालो. सव्वा दहा वाजून गेले होते. इथून दोनेक किलोमीटर पुढे गेलं की सिंहगडचा घाटरस्ता सुरू होतो. सुरुवातीलाच वन विभागाची चौकी आहे. इथे स्वतःचं वाहन घेऊन जाणाऱ्यांकडून शुल्क आकारणी केली जाते. चालत जाणाऱ्यांना आणि सायकलस्वारांना शुल्क माफ. एकूण आठ किलोमीटरचा घाट आहे. पहिले तीन किलोमीटर कठीण चढ आहे. घाट सुरु झाल्यापासून सिंहगडाने त्याची 'झलक-अ-शर्फी' एकदाही दाखवलेली नव्हती. आणि अचानक एका वळणारून पुढे आल्यावर समोर ढगांची झूल पांघरून उभा असलेला तो दिसला. जणुकाही मेहनत करून शरीर कमावलेला बलदंड मल्लच. त्याच्या डोंगरात कोरलेला रस्ता आणि त्याची उंची बघून पुन्हा एकदा पोटात गोळा आला. 'अरे बापरे... अजून एवढं अंतर तोडायचंय की काय?' असा विचार क्षणभर मनात आला. पण एकच क्षण, पुढच्या क्षणाला पेडलवर आणखी जोमाने पाय पडायला लागले. पहिल्या तीन किलोमीटरचा तीव्र चढत संपल्यानंतर दिड-दोन किलोमीटरचा सोपा रस्ता आहे. खेड-शिवापुरकडून सिंहगडाकडे येणारा रस्ता मिळतो त्या फाट्यावर येऊन पोहोचलो. उजव्या हाताला एक टपरी आहे. दहा मिनिटं थांबलो. एक वडापाव आणि चहा झाला. बऱ्यापैकी उंचावर आल्यामुळे धुक्याचं प्रमाण वाढलं होतं. उजव्या हाताला सिंहगड ढगांच्या आडून माझ्याशी लपाछपी खेळत होता. या फाट्यापासून मात्र ट्रॅफिक बऱ्यापैकी वाढलं. पुढे निघालो. अजून तीन किलोमीटर अंतर शिल्लक होतं. चढ अजूनच तीव्र झाला होता. पेडलिंग पेशन्सची परिक्षा पहात होतं. रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाढल्या होत्या. आणि रस्ता मात्र चिंचोळा झाला होता. याशिवाय चालत जाणाऱ्यांची गर्दी होतीच. सगळे पावसाळी पर्यटनाच्या 'ऑसम' मूडमध्ये असल्यामुळे फोटोशूट मोडमध्ये. या सगळ्या भाऊगर्दीत सायकल जपून चालवावी लागत होती. बघता बघता सिंहगडाच्या पार्कींग पर्यंत पोहोचलो. पार्कींग तुडुंब भरून वाहत होतं. पावसाच्या पाण्याने नाही... गाड्या आणि माणसांनी. गर्दीतून वाट काढत एका ढाब्याजवळ पोहोचलो. धाब्याचे मालक आणि नोकर सगळ्यांना आपल्या धाब्यासमोर गाडी लावण्याचा आग्रह करत होते. शेजारच्या धाबेवाल्याच्या गाड्या आपल्यासमोर लागू नयेत याची काळजी घेत होते. क्वचित शेजारच्याशी बाचाबाचीही होत होती. मी एका ढाबेवाल्यासमोर सायकल लावली. चहा घेतला आणि पटकन निघालो. प्रचंड गर्दीतून चालताना अडथळे येत होते. पर्यटनहौशी लोक फोटो काढण्याच्या मूडमध्ये, हंसीमजाक, चेष्टा मस्करी, विविध पोजेस् मधले फोटो, भाजलेली कणसं, शेंगा सगळं चालू होतं. ही सगळी वेडी मंडळी आहेत. सिंहगडाचा पिकनिक स्पॉट करून ठेवलाय. पण सिंहगड चढायला मनात वेडंच असावं लागतं. हं... कोणतं वेड घेऊन जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्यवेड घेऊन कुणी मावळा सिंहगडावर गेला आणि त्याने अजरामर इतिहास घडवला. तानाजी मालुसरे त्यांचं नाव. कुणी गडकोटवेड घेऊन भल्या पहाटे सिंहगडावर ट्रेकींगला येतात. छातीचा भाता फुलवून दमण्याभागण्यातच त्यांचा आनंद. इतिहासप्रेमी, अभ्यासक वेड घेऊनच गडावर जातात. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधतात. काहींना सायकल घेऊन फिरण्याचं वेड. तसंच पर्यटन हे सुद्धा वेडच की. पण त्यात मौजमज्जा आणि आणि उधळलेपणा जास्त झालाय म्हणून कुठेतरी टोचतं. त्या उधळलेपणात आपला गौरवशाली इतिहास हरवू नये असं वाटतं. या विचारातच चालत चालत तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे पोहोचलो. गडावर धुकं पसरलं होतं. पाऊसही रिमझिम चालू होता. समाधीकडे खूप गर्दी होती. कुणी समाधीसमोर नतमस्तक होत होता. कुणी तानाजी मालुसरेंच्या पुतळ्यासमोर मुजरा करत होता. कुणी मुजरा करताना स्वतःचा फोटो काढत होतं. समाधीच्या बाजुलाच एक तरुणांचा घोळका जमला होता. गर्दीतून एक खणखणीत आवाज ऐकू येत होता. मी कुतुहलाने पुढे गेलो. सत्तरीतले एक आजोबा खड्या आवाजात तानाजींचा भीमपराक्रम सांगत होते. जमाव तल्लीन होऊन ऐकत होता. हेच ते संभाजी डिंभळे. कथानक संपलं. लोक आदराने आजोबांच्या पाया पडू लागले. मी सुद्धा पुढे गेलो. पायाला हात लावून नमस्कार केला. खिशात हात घातला. अनपेक्षितपणे १०० रुपयांची नोट हाताला लागली. ती त्यांच्या हातात ठेवली. 'रामकृष्णहरी' त्यांच्या तोंडून उच्चार आला. आपसूकच सगळेजण रामकष्णहरी म्हणाले. तिथून निघालो. कोंढाणेश्वराचं दर्शन घेतलं. पुन्हा स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. येतायेता टिळक बंगल्यासमोर हात जोडले. पुन्हा पार्कींगच्या दिशेने निघालो. रिवाजाप्रमाणे ढाब्यावर पिठलं भाकरी खाल्ली. बिल चुकतं केलं. बिल देताना अचानक लक्षात आलं. घाटातून येताना खाल्लेल्या वडापावचे पैसेच न देता वर आलोय. पुन्हा सायकलवर स्वार झालो. पाऊस पडत होता. जाताना उतार होता. सायकलवर नुसतंच बसून, फक्त ब्रेक दाबत उतरत होतो. उलट त्यामुळेच थंडीने कुडकुडायला होतं होतं. परत डोणज्यात येतो तर पाऊस गायब. पुन्हा एक चहा झाला. पुन्हा निघालो. फारसा दमलो नसलो तरी मनात सकाळचा उत्साह नव्हता. खडकवासला धरणावर पोहोचलो. सकाळपेक्षा गर्दी खूपच वाढली होती. त्यातून वाट काढत काढत डावीकडे एन डी ए गेटच्या दिशेने वळलो. शिवणे ओलांडून वारज्यात आलो. बायपास हायवेला लागलो. चांदणी चौक, बावधन, सूस-पाषाण रोड, बाणेर पार करत भूमकर चौकात आलो. उजवीकडे वळलो. मनात नेहमीचेच भाव. पंचपक्वान्नाचं जेवण भरपेट केल्यानंतर एखादा चमचाभर गोड सुद्धा नकोसं वाटतं. हे भूमकर चौक ते घरापर्यंतचं अंतर सुद्धा नेहमीच मला नकोसं वाटतं. तसाच पेडलींग करत श्रीधर नगरमध्ये पोहोचलो.
सकाळी निघताना भक्तीचं प्रतीक तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घडलं. सिंहगडावर शक्तीचं प्रतीक तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घडलं. अशी ही #भक्तिशक्ती सायकलस्वारी मनाला उत्तेजन देणारी झाली.
परत येताना वडापाववाल्याची केलेली उधारी चुकती केली....हे लिहायचं राहिलं आहे.
३५ रुपये झाले होते माझ्याकडे ३०च रुपये होते. मी आठवणीने पैसे द्यायला आल्याबद्दल ५ रुपये माफ करण्यात आले.
😃😃
Comments
Post a Comment